Saturday, December 19, 2015

साधक , सेंट आणि संत /शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक 

मदर तेरेसा ह्यांना मिळालेल्या सेंट ह्या पदामुळे सध्या बरीच चर्चा चालू आहे . खरेतर नवशैवांनी ह्यात पडावे कि न पडावे हा एक प्रश्नच आहे . नवशैव धम्माचा विज्ञानाला संपूर्ण पाठींबा असला तरी विज्ञानाचीही कठोर चिकित्सा झाली पाहिजे असा आग्रह आहे . जगातले सर्वच धर्म कालबाह्य झाले असून जगाला धर्माची गरज राहिलेली नाही असे  मला वाटते पण त्याचबरोबर निर्वाण हा माझा अनुभव असल्याने त्याला ओलांडून जावे असे मला वाटत नाही . मात्र हे निर्वाण उसने देता येत नसल्याने त्याबद्दल फक्त शक्यता नोंदवून पुढे जावे हे सध्याच्या काळाला धरून आहे . चमत्कार हा भ्रमही असू शकतो किंवा स्वानुभव पण त्याला सार्वजनिक जीवनात कसलेही स्थान देता नये . दुर्देवाने सर्वच धर्म चमत्काराचे सामाजीकरण करून त्याचा धंदा करू पाहतात . ९९९९९. ९९९ % चमत्कार हे त्या त्या व्यक्तीला होणारा भ्रमच असतो . अशावेळी चमत्काराच्या आधारे सेंटत्व ठरवणे हेच मुळात बालिश आहे . पण ख्रिस्ती धर्माचा पायाच मुळी चमत्कार असल्याने त्यांना हे नाईलाजाने करावे लागते .जो चमत्कार करतो तोच सेंट अशी सेंटची व्याख्या आहे त्यामुळे हे सर्व सेंट ठरवण्यासाठी झाले आहे हे उघड आहे . संत हा शब्द वेगळा आहे . सेंट म्हणजे संत न्हवे . संत म्हणजे ज्याच्या सांत असण्याचा अंत झाला आहे आणि ज्याला मुक्ती प्राप्त झाली आहे असा !. साधक तो जो संत होण्यासाठी धडपडतो. महाराष्ट्रात निवृत्तीनाथ , सोपानदेव , चक्रधर , मुक्ताबाई , ज्ञानेश्वर ,नामदेव , गोरा  कुंभार , जनाबाई ,  एकनाथ , तुकाराम , बहिणाबाई , असे संत होवून गेले काही होता होता खोळंम्बले . काहींनी स्वताच्या मुक्तीपेक्षा समाजसुधारणा महत्वाची मानली जसे कि गाडगेबाबा . संत म्हणजे भक्ती मार्गाने निर्वाण प्राप्त करणारा साधक . त्याउलट जे निरीश्वरवादी ज्ञानमार्गाने निर्वाण प्राप्त करतात ते बुद्ध !संत ईश्वर मानतात बुद्ध ईश्वराला नकार देतात . त्यामुळेच संत अनंताच्या भाषेत बोलतात तर बुद्ध शून्याच्या ! ह्यांच्या नावानेही चमत्कार सांगितले जातात पण चमत्कार ही ऑफिशियल अट नसते ख्रिस्ती धर्मात मात्र ही ऑफिशियल अट आहे .  सार्वजनिक जीवनात चमत्कारांना अजिबात जागा असू नये असे माझे स्पष्ट मत आहे पण ख्रिस्ती धर्म तर चमत्कारांना सार्वजनिक करतो अशावेळी करायचे काय ? घटनेनुसार त्यांचा हा धार्मिक हक्क आहे . त्यामुळे आपण एवढेच म्हणू शकतो . '' आम्हाला हा चमत्कार मान्य नाही पण तुमच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मी आदर करतो . 

शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक 



No comments:

Post a Comment