Sunday, July 16, 2023

 शैवलिंगांचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक 


भारतात सर्वाधिक प्रचलित जी साकारपूजा आहे ती शैव लिंगांची आहे मात्र अनेकांना लिंगाविषयी खूप कमी माहिती असते लिंग म्हणजे सेक्स अवयव किंवा जेंडर अशीच अनेकांची समजूत असते पण ती खरी न्हवे त्यासाठी वृषण शिस्न आणि योनी असे स्वतंत्र शब्द आहेत वैदिकांनी अर्धवट ज्ञानातून शिवाची शिस्नदेव अशी हेटाळणी केली आणि त्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले लिंग म्हणजे फॅलिक पूजाही न्हवे अनेकांनी विशेषतः युरोपियन अर्धवटरावांनी ग्रीकांच्यात अशी पूजा होती म्हणून भारतातील शैवांना ती लागू केली प्रत्यक्षात लिंग म्हणजे शैव तत्वांची  साकार अभिव्यक्ती ! आणि ह्या अभिव्यक्तीतील पूज्य म्हणजे शून्य म्हणजेच शिवाकडे जाण्यासाठी केली जाणारी अवलंबली जाणारी तंत्रे म्हणजे पूजा होय . 

लिंगाचे अनेक प्रकार होतात त्यातील मुख्य बारा प्रकार इथे देतो आहे 

१ शिवलिंग ह्यात फक्त आकाशाच्या दिशेने जाणारा स्तंभ उभा केला जातो जो अनंत व शून्य दिशेने जातो 

२ शक्तिलिंग ह्यात योनीसारखे दिसणारे अर्धे मंडल जे खुले असते किंवा पूर्ण मंडल वर्तुळ काढले जाते 

३ ईश्वरलिंग वा ज्योतिर्लिंग ह्यात स्तंभ व मंडल दोन्ही असते हल्ली सर्वत्र हेच दिसते आणि हेच शिवलिंग म्हणून ओळखले जाते 

४ सूर्यलिंग ह्यात ईश्वरलिंग असते पण त्याचबरोबर त्याच्यावर सूर्याचे वर्तुळ किंवा सूर्य स्त्री व पुरुष चेहऱ्याचा काढला जातो कधीकधी सूर्य सिंह , हत्ती ह्यासारख्या जीवांच्या आकाराचा असतो हस्तमुखी गणपती हे सूर्यलिंग आहे हेसुद्धा लोक आता विसरून गेलेत सूर्याच्या अवस्थांनाही नंतर पुजले जाऊ लागले 

पहाटेचा सूर्य ब्रह्म पृथ्वी भूमी  ब्रह्ममुहूर्त सर्वांना माहीत आहेच 
सकाळचा सूर्य राम व पृथ्वी सीता 
दुपारचा सूर्य मार्तंड मल्हार व पृथ्वी धरा  
संध्याकाळचा सूर्य कान्हा वा श्याम व पृथ्वी श्यामा वा श्यामल वा राधा  (ह्या दोघांचा रोमान्स हा महाराष्ट्रातून उत्तर भारतात निर्यात झाला आहे )
रात्रीचा सूर्य नारायण व नारायणी  (ह्या दोघांचा रोमान्स हा महाराष्ट्रातून उत्तर भारतात निर्यात झाला आहे )
पूर्ण सूर्य यम व पृथ्वी यमी यमाचा मूळ अर्थ आहे प्रकाशाचा स्रोत सत्य अहिंसा अचोर्य सुकाम हे यम व स्वच्छता वैग्रे नियम म्हणून ओळखले जातात यमपालनाशिवाय मोक्ष मिळत नाही पुढे ह्या पंचसूर्यांना देहालिंगेही मिळू लागली 


५ पृथ्वीलिंग वा मातृलिंग ह्यात लिंग अर्ध्या किंवा पूर्ण मंडलाच्या आकाराचे असते ते स्त्रीच्या योनीच्या आकाराचे दिसते म्हणून अनेकांना ती योनीपूजा वाटत असते प्रत्यक्षात ते योग्य न्हवे 

६ मुखलिंग ह्यात शिवलिंगावर वा ईश्वरलिंगावर चौमुखी त्रिमुखी द्विमुखी एकमुखी असे मुख किंवा अनेक मुखे काढली जातात भारतात काही लिंगे अशी आहेत कि ज्यांच्यावर शंकर , भैरव आदी मोक्ष मिळवलेल्या लोकांची मुखे काढली जातात अपवादात्मकवेळा शंकर , कपिल , महावीर , गौतम बुद्ध ह्यांच्या मुखांची चौमुखी लिंगेही निर्माण केली गेली आहेत कारण महावीर बुद्ध हे शैवांच्या दृष्टीने सिद्धपुरुष आहेत गौतम बुद्धाचे नावच मुळात सिद्धार्थ होते  अनेकदा पृथ्वी ही मातृदेवता म्हणून किंवा सात आसरा म्हणून पुजली जाते ती देहलिंग म्हणूनच असते ह्यातील सहा आसरा ह्या सहा ऋतूच्या प्रतीक असून सातवी ऋतूच्या पलीकडची संपूर्ण अखंड पृथ्वी आहे 

७  मोक्षलिंग  किंवा सिद्धलिंग  ह्यात जे जीव शिवात मोक्ष मुक्ती मिळवून सिद्ध झाले अशा मुक्त झालेल्या सर्व सिद्ध स्त्री आणि पुरुषाची मूर्ती बनवून पूजा केली जाते उदा भोलेनाथ(भोला ह्या शब्दाचा मूळ अर्थ भलं करणारा असा आहे निरागस असा नाही )  , आदिनाथ , गणपती , स्कंद , नंदी , अय्यप्पा , रवळनाथ,  भूतनाथ , बाबुलनाथ , गोरखनाथ , वेताळनाथ( हा वेळाल व वेताळ ह्या शेतकरी भटक्या गणाचा प्रमुख होता आणि शेतात जे बुजगावणे म्हणून उभे केले जाते ते प्रत्यक्षात ह्याचे देहलींग आहे आणि ते काळ्या कपड्यात असायचे तो शेतीचे रक्षण करतो ही ह्यामागची धारणा ह्यालाच प्रथम शंकराने आपला त्रिशूळ नांगर म्हणून कसा वापरायचा ते शिकवलं आमच्या दोन कुलदेवतांपैकी हे एक आहे दुसरी अर्थात शांतादुर्गा शेती करता करता हा मोक्षाला पोहचला ह्याला काही ठिकाणी वेतोबा म्हणतात कारण काही ठिकाणी ह्याचे मोक्षलिंग वेतापासून बनवले जाते  )  , भैरवनाथ , पंढरीनाथ , ज्योतिबा , खंडोबा , रेणुका , यल्लमा , चामुंडा , मुरुगन , कार्थिकेयन , सुब्रमण्य , कुमारनं भैरोबा बिरोबा योगिनी योगी 

८ तत्वलिंग ह्यात शिव, शक्ती  ,ईश्वर, सूर्य व  तंत्रे (ह्यात अनेकदा यंत्रे काढून)  ह्या तत्वांची त्यातल्या एका विशेषाची त्यांना देहरूप देऊन पूजा केली जाते उदा  देह तत्वाची सुंदर सुंदरा सुंदरी प्रचण्डेश्वर प्रचंडी बुद्धितत्त्वाची शंभू व शाम्भवी भावतत्वाची भवानी भुवनेश्वर सृजनतत्वाची अंबा जगदंबा गौरी अवकाशतत्वाची दुर्गा दुर्गेश्वर सृजनतत्वाची माया शरीरतत्वाची मीनाक्षी तंत्रतत्वांची भैरव भैरवी मुक्तस्थितीची हरा हरेश्वर कालतत्वाची महाकाली महाकाल अवस्था तत्वाची (प्र)चंडी प्रचंड प्रचंडेंश्वर गौरेश्वर विद्या वैद्यनाथ प्राणेश्वर ईश्वरतत्वाची महादेव महादेवी 

९ निसर्गलिंग ह्यात निसर्गातील लिंगसदृश्य आकाराला लिंग म्हणून पुजले जाते उदा वड हा शक्तिलिंग आहे तो शक्तीचा पिसारा व पसारा मांडतो त्यामुळेच वटपौर्णिमेला बायका शक्तिलिंग म्हणून त्याची पूजा करतात आर्यानी ह्या वटपौर्णिमेचा सगळा अर्थच बदलून टाकला आहे ह्याउलट पर्वत हे शिवलिंग म्हणून पुजले जातात तर नदी ही मातृलिंग म्हणून पुजली जाते  

१० स्थानलिंग ह्यात त्या त्या स्थानाचे लिंग म्हणून शिवलिंग शक्तिलिंग वा प्रामुख्याने ईश्वरलिंगाची स्थापना केली जाते म्हणजे काशी नगराचा  काशिनाथ कोपरड्याचा कोपर्डेश्वर स्थानाचा  स्थानेश्वर रंकाळ्याच्या रंकाळेश्वर 

११ व्यवसायलिंग ह्यात व्यवसायाला अनुरूप शरीर वा रूप शोधले जाते उदा नटराज हे नृत्य व  अभिनयाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे किंवा सतार वा वीणा वाजवणारी शक्ती प्रतिमा  ही गायकांसाठी आहे पुढे ती सरस्वती म्हणून प्रमोट केली गेली ते सोडा गंमतीचा भाग असा कि तिच्या हातातील शिववीणेला आजकाल रुद्रवीणा म्हंटले जाते असो यक्ष हे  रक्षणाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीचे व्यवसायलिंग आहे विश्वकर्मा हे  लाकूडकाम करणाऱ्या सर्वांचे व्यवसायलिंग आहे 

१२ युग्मलिंग ह्यात दोन तत्वांचे युग्म पुजले जाते उदा शिव आणि शक्ती ह्या दोन तत्वांचे मिळून झालेले अर्धनारीनरेश्वर ! पार्वतीच्या मांडीवरील गणपती किंवा गौरी आणि गणपती वैग्रे 

युरोपियन लोक भारतात आले तेव्हा ते हा अवाढव्य व गुंतागुंतीचा पसारा पाहून भांबावून गेले त्यामागचे तत्वज्ञान त्यांना माहित नसल्याने ग्रीक पॅगनिझमच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा पसारा पाहिला त्यातच हे लोक सेक्सबाबत सोवळे त्यामुळे लिंग वैग्रे त्यांच्या आकलनाच्या आणि पचनाच्या पलीकडे होते त्यांना शैव व्हिजन कळलेच नाही अनेकदा तर शैवांच्यापासून लैंगिक पळ काढलेला बरा असा व्हिकटोरियन प्युरिटन विचार त्यांनी केला परिणामी युरोपियन साम्राज्यवादी  काळात शैव भारतीयांची प्रचंड पीछेहाट झाली 

श्रीधर तिळवे नाईक 
(शैव पुरोहितांच्यापुढे १६जुलै २०२३ रोजी दिलेल्या व्याख्यानावरून )

Thursday, May 17, 2018

संविधान आणि भीती कशाची आहे ?श्रीधर तिळवे नाईक

१ काँग्रेसबद्दल भीती फक्त आणीबाणीच्या काळात निर्माण झाली आणि इंदिरा गांधी हत्येनंतर शीखविरोधी दंगलीत गांधीहत्येनंतर अशीच भीती ब्राम्हणांच्यात निर्माण झाली होती असे जुने वृद्ध लोक सांगायचे म्हणजे भीती निर्माण करण्याबाबत काँग्रेस फार सोवळी आहे असे कुणीही मानू नये शिवाय गावोगावचे काँग्रेसचे सहकारसम्राट आणि अलीकडचे काही शिक्षणसम्राट व राजघराणीसम्राट भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडतायत असे नाही बिहारमध्ये लालू आणि उत्तर प्रदेशात मुलायम हेही भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडलेत असे दिसत नाही कम्युनिस्टांनी रशिया व चीन मध्ये भीती निर्माण करण्यात परमोच्च शिखर गाठले होते तेव्हा शासक समूह हा कुठेही आणि कसाही असला तरी भीती निर्माण करण्यात वाकबगार असतो ही वस्तुस्थिती ! किंबहुना राजकारण हा भय आणि भीती निर्माण करण्याचा कारखाना आहे सत्तेची अपरिमित असोशी व लालसा ही प्रत्येक माणसाच्या ठायी आहे आणि ती प्रत्येकालाच वेडं बनवते कुणी कलाक्षेत्रात आपली सत्ता निर्माण करतो तर कुणी प्रशासनात ही सत्ता आपल्या आयुष्यासंदर्भात आपल्या मर्डरपासून आपल्या मुलाच्या शिक्षणापर्यंत एकतर्फी निर्णय घेऊ शकते असे वाटणे म्हणजे भय आणि ह्या भयाचे प्रात्यक्षिक सत्ताकारी तांडव म्हणजे भीती .
२भाजप आत्ताचे संविधान रद्द करून मनू आदी स्मृतिकारांच्या स्मृतीनुसार धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणी संविधान आणून इस्लामि देशांनी जसे शरियत लागू केले तसे हे ब्राह्मविधान निर्माण करून ते लागू करेल ही भाजपविषयीची भीती !ह्या भीतीला काही आधार नाही हे पटवणे हे भाजपच्या प्रवक्त्यांचे व विचारवंताचे काम आहे ते हे काम करत नाहीत उलट मनूचा पुतळा राजस्थान विधानसभेच्या आवारात निर्माण करून ते ही भीती वाढवतायत

३ प्रश्न असा आहे कि त्या त्या देशातील मुस्लिमांना जसे शरियत हवे होते तसे ह्या देशातील हिंदूंना मनूचे व इतरांचे धर्मशास्त्र हवे आहे का ?शैवांना अर्थ , काम आणि मोक्ष असे तीनच अक्ष हवे होते असे मी कायमच ओरडून सांगत असतो पण त्याचा एक मूलभूत अर्थ असा होतो कि शैवांना कायदेव्यवस्था धर्मानुसार न्हवे तर अर्थ आणि काम ह्या दोन अक्षांनुसार हवी असते शैवांच्या मते हे दोन्ही अक्ष अस्थिर व सतत काळानुसार बदलत असल्याने कायदेही सतत बदलणे अपरिहार्य आहे ह्यातील अर्थ हा सामाजिक आणि काम हा कौटुंबिक तर मोक्ष हा पूर्णपणे वैयक्तिक आहे ह्यामुळे बदलत्या कायद्यांना सतत मान्यता देणे हे शैवांच्या अंगवळणी पडलं आहे किंबहुना कायद्याबाबत शैवांची अटीट्युड who bothers अशीच आहे ह्याचा एक दुष्परिणाम असा झालाय कि कुणीही कोणताही कायदा आणला तरी शैव तो सहज स्वीकारतात त्याची साधी चिकित्साही न करता ! ह्या देशातील वैश्य शूद्र अतिशूद्र आणि आदिवासी ह्यांची मानसिकता ही शैव मानसिकता आहे आणि तिची कायद्याबाबतची निष्काळजी वृत्ती ही तिला अनेकदा गुलाम बनवण्यात महत्वाचा रोल बनवते त्यामुळेच उद्या भाजपने मनूचे नवे धर्मशास्त्र नवे संविधान म्हणून आणले तर शैव खरोखर त्याची चिकित्सा करतील का कि पुन्हा who bothers म्हणून खांदे उडवतील ? शैवांना सत्ताधारी म्हणून राजधानीत एक गणाधिपती हवा असतो तो स्वदेशी कि विदेशी हा प्रश्नही त्यांना पडत नाही किंबहुना त्यांच्या मानसिकतेत राजकारण ही फक्त करमणूक आहे आणि निवडणूक हा आणखी एक गणपती उत्सवासारखा उत्सव ! आपल्या आयुष्यावर तिचा काही सखोल परिणाम आहे असे त्यांना वाटतच नाही धसका घ्यावा अशी ही निष्काळजी वृत्ती आहे शैव विचारवंतांना खरी भीती ह्या निष्काळजी वृत्तीची वाटायला हवी

४ आता समजा उद्या भाजपने सगळ्यांचे आडाखे चुकवत आत्ताचे संविधान बदलून एक नवे समान नागरी कायदा पाळणारे काश्मीर वैग्रे राज्याचे स्वायत्त विशेष दर्जा रद्द करणारे सर्व प्रकारची समानता व समता जोपासणारे अतिशय आधुनिक असे संविधान आणले  तर काय करायचे ? माझे स्वतःचे स्पष्ट मत असे कि असे काही आत्तापेक्षा अधिक उत्तम व अव्वल दर्जाचे संविधान भाजप आणत असेल तर मी त्याचे स्वागत करायला एका पायावर तयार आहे किंबहुना काँग्रेसने असे संविधान आणण्याची जबाबदारी पार पाडली असती तर भाजपचा उदय झालाच नसता असे माझे मत आहे पण भीती अशी आहे कि असे काही न होता भाजप सर्व प्रकारची विषमता जोपासणारेच नवे संविधान आणेल आणि खरी गोची इथेच आहे भारत जाऊ द्या पण ज्या उत्तर प्रदेशात भाजपचे प्रचंड बहुमत आहे तिथेही भाजपने गोव्याप्रमाणे समान नागरी कायदा आणलेला नाही भाजप फक्त हिंदूंच्या भावनांशी खेळतंय ही शंकाच हिंदूंची खरी भीती आहे

जुनी पोस्ट ७/५ /१८

श्रीधर तिळवे नाईक

नितिन भरत वाघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढे मिळतील मी अद्यापही पुरोहित समुदायाबद्दलच लिहितोय











Tuesday, March 20, 2018

कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली त्याबद्दल अभिनंदन ! लिंगायतांना हिंदूत टाकून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न प्रथम ब्रिटिशांनी केला नंतर एतद्देशीयांनी ! मूळात ह्याची सुरवात श्रीपतीने केली होती . कुठलीही क्रांती वैदिकांच्या गळाला लावून तिची हवा काढून घेण्याचे तंत्र वैदिकांनी व्यवस्थित घोटवले आहे श्रीपतीने त्याची सुरवात केली आणि लिंगायत धर्मातही वर्ण आणि जातीव्यवस्था घुसली . स्वतंत्र धर्म म्हणून मागणी करतांना आम्ही वेद , वर्ण , जात मानत नाही असे मागणी करणाऱ्यांनी सांगितलय त्याचा प्रत्यय व्यवहारातही यावा नाहीतर अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे फायदे लाटण्यासाठी केली गेलेली एक राजकीय चाल एव्हढेच ह्या घटनेचे महत्व राहील तेव्हा नवा धर्म हे उत्तमच आहे पण लिंगायत प्रत्यक्ष व्यवहारात जातीयता पाळताना दिसले तर हिंदूंच्यात आणि त्यांच्यात फरकच राहणार नाही
तेव्हा उत्सव साजरा करतांना जबाबदारीही ओळखलेली बरी . बसवेश्वरांचा लढा हा वर्ण जाती अंताचा लढा होता हे प्रत्येकाने नीट लक्ष्यात घेतले तर बरे !नाहीतर नाव बसवेश्वरांचे आणि करणी वैदिकांची असा दुट्टपीपणा होईल आणि सारे मुसळ पुन्हा केरात जाईल

श्रीधर तिळवे नाईक 

Saturday, December 19, 2015

साधक , सेंट आणि संत /शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक 

मदर तेरेसा ह्यांना मिळालेल्या सेंट ह्या पदामुळे सध्या बरीच चर्चा चालू आहे . खरेतर नवशैवांनी ह्यात पडावे कि न पडावे हा एक प्रश्नच आहे . नवशैव धम्माचा विज्ञानाला संपूर्ण पाठींबा असला तरी विज्ञानाचीही कठोर चिकित्सा झाली पाहिजे असा आग्रह आहे . जगातले सर्वच धर्म कालबाह्य झाले असून जगाला धर्माची गरज राहिलेली नाही असे  मला वाटते पण त्याचबरोबर निर्वाण हा माझा अनुभव असल्याने त्याला ओलांडून जावे असे मला वाटत नाही . मात्र हे निर्वाण उसने देता येत नसल्याने त्याबद्दल फक्त शक्यता नोंदवून पुढे जावे हे सध्याच्या काळाला धरून आहे . चमत्कार हा भ्रमही असू शकतो किंवा स्वानुभव पण त्याला सार्वजनिक जीवनात कसलेही स्थान देता नये . दुर्देवाने सर्वच धर्म चमत्काराचे सामाजीकरण करून त्याचा धंदा करू पाहतात . ९९९९९. ९९९ % चमत्कार हे त्या त्या व्यक्तीला होणारा भ्रमच असतो . अशावेळी चमत्काराच्या आधारे सेंटत्व ठरवणे हेच मुळात बालिश आहे . पण ख्रिस्ती धर्माचा पायाच मुळी चमत्कार असल्याने त्यांना हे नाईलाजाने करावे लागते .जो चमत्कार करतो तोच सेंट अशी सेंटची व्याख्या आहे त्यामुळे हे सर्व सेंट ठरवण्यासाठी झाले आहे हे उघड आहे . संत हा शब्द वेगळा आहे . सेंट म्हणजे संत न्हवे . संत म्हणजे ज्याच्या सांत असण्याचा अंत झाला आहे आणि ज्याला मुक्ती प्राप्त झाली आहे असा !. साधक तो जो संत होण्यासाठी धडपडतो. महाराष्ट्रात निवृत्तीनाथ , सोपानदेव , चक्रधर , मुक्ताबाई , ज्ञानेश्वर ,नामदेव , गोरा  कुंभार , जनाबाई ,  एकनाथ , तुकाराम , बहिणाबाई , असे संत होवून गेले काही होता होता खोळंम्बले . काहींनी स्वताच्या मुक्तीपेक्षा समाजसुधारणा महत्वाची मानली जसे कि गाडगेबाबा . संत म्हणजे भक्ती मार्गाने निर्वाण प्राप्त करणारा साधक . त्याउलट जे निरीश्वरवादी ज्ञानमार्गाने निर्वाण प्राप्त करतात ते बुद्ध !संत ईश्वर मानतात बुद्ध ईश्वराला नकार देतात . त्यामुळेच संत अनंताच्या भाषेत बोलतात तर बुद्ध शून्याच्या ! ह्यांच्या नावानेही चमत्कार सांगितले जातात पण चमत्कार ही ऑफिशियल अट नसते ख्रिस्ती धर्मात मात्र ही ऑफिशियल अट आहे .  सार्वजनिक जीवनात चमत्कारांना अजिबात जागा असू नये असे माझे स्पष्ट मत आहे पण ख्रिस्ती धर्म तर चमत्कारांना सार्वजनिक करतो अशावेळी करायचे काय ? घटनेनुसार त्यांचा हा धार्मिक हक्क आहे . त्यामुळे आपण एवढेच म्हणू शकतो . '' आम्हाला हा चमत्कार मान्य नाही पण तुमच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मी आदर करतो . 

शैवाचार्य श्रीधर तिळवे -नाईक 



Wednesday, December 16, 2015

समतोल 
एकतर
सगळ्यांना घेवून जा 
प्रसरण पाव 
टोक गमव 

किंवा 
टोक काढत रहा 
सगळ्यांना गमव 
मरण पाव 

निर्वाणापुर्वी 
समतोल 
इमेजिनेशन  आहे 
-------------------------------------------
घाट 
तुझे भक्त वाढत जातील 
तर क्रांति होईल 

पण वाढतायत ते फक्त डीलर्स 

मला कळत नाही 
तू त्यांच्या वाटाघाटी 
उघड्या डोळ्यांनी का सहन करतोयस 

कि वाट पहायला लावणारे हे घाट 
तुझेच आहेत ?
------------------------------------------------

आणिबाणी 
जोवर मी कमावतोय 
तोवर मी नातेवाईकांचा आहे 

एक दिवस असा येईल 
मी जख्ख म्हातारा होईन 

मग पर्याय दोन उरतील 

माझ्यासाठी आत्महत्या 
तुझ्यासाठी निर्वाण 

तो क्षण खरा 
आणीबाणीचा असेल 

मी त्या क्षणासाठी 
काळाला टोक काढतो आहे 
-----------------------------------------------------
अडगळ 
मी ह्या समाजात 
अडगळ म्हणून पडून 

कित्येकांना गेलास सापडून 
मला नाही 

तुझे नाव घेताच माझे मोरपीस होते 
निर्वाण म्हणताच मी मोर होतो 

कोल्हापूरकर  म्हणतात
बघा बघा बघा 
अडगळ पिसारा फुलवून नाचतीये 
अडगळ डान्स विथ झंकार बिट्स 

त्यांना माहित नाही 
मी तुझ्या तांडवाचे 
लेटेस्ट मॉडेल आहे 
जे अडगळ  म्हणून 

सर्वत्र कोसळते आहे 

Sunday, December 13, 2015

हे शिवा  

कुठूनही सुरवात केली 
तरी मी तुझ्यापाशीच पोहचतो 


तू माझा पूर्णविराम आहेस