Friday, December 11, 2015

शिव /श्रीधर तिळवे 

तू 

तू जगातला एकमेव अनाथ देव आहेस

तुला ना आई ना बाप

केवळ राजीनामा देता येत नाही म्हणून
तू ही जगाची कंपनी चालवतोयस

स्वयंभू मालकाचे हे असे होते
……

------------------------------------
नाहीतर 

आकार नाही 
म्हणून पवित्र आहेस 

देह प्राप्त केला असतास 
तर पाप कळले असते 
------------------------------------
खात्री 
पानगळतीचे दु :ख्ख नाही 
नवी पाने येतील 

पाचोळ्यापासून झाड बनवून 
तू आम्हाला पाठवले आहेस 

मृत्यू देणाऱ्या शिशिरथंडीत 
तू माझ्या आतला पाचोळा 
मला भेगा पाडून 
बाहेर फेकतो आहेस 

मला खात्री आहे 
एक दिवस माझे झाड वसंत होईल 
आणि जगाला सुगंधाची सावली देईल 
--------------------------------------------
मळविनाशका 
मळविनाशका ,
तुला माझा हा मळदुर्गंध 
असह्य होत नाही का ?

अरे जुना रस्ता साफ करण्याऱ्या बायकाही 
माझ्या समोरून 
त्यांच्या सराव झालेल्या नाकाला 
रुमाल लावून जात आहेत 

कि जगाच्या म्युन्सिपालटीत 
तू माझा कचरा करूनच 
माझा शेवटचा श्वास काढून घेणार आहेस ?
--------------------------------------------------
सर 
सर म्हणतायत 
अभ्यास कर अभ्यास कर 

त्यांना मी कसे सांगू 
माझा अभ्यासक्रम तू आहेस 

सर म्हणतायत 
जे कळत नाही ते घोकावे 

तू काय घोकून येणारी चीज आहेस ?
---------------------------------------------------
नास्तिक 
आसपास नास्तिकांचा जमाव 

माझा असण्यावर विश्वास आहे 

माझ्यासाठी तू ''असण्याची '' मूर्तता आहे 

तुझ्याविना पूर्तता अशक्य 

मी नास्तिकांना फेटाळत नाही 

आस्तीकांचे गुन्हेच असे कि 
भक्ती मेलेली बरी 
असे वाटावे 

भक्ती उपाय होण्याऐवजी 
रोग झाली कि 
डॉक्टरांनाही नकोशी वाटते 

माझ्यासाठी नास्तिक 
डॉक्टर आहेत 
-------------------------------------

श्रीधर तिळवे नाईक 

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )


















No comments:

Post a Comment