Saturday, August 1, 2026

 आशुतोष दिवाण यांनी अलीकडे म्हणजे आजच एक टिपणी टाकली आहे त्या अंगाने हे लिखाण करत आहे तिचा संदर्भ कळावा म्हणून प्रथम त्यांची टिपणी टाकतो ते म्हणतात,"

तिळवे सर,

आपण नेहमी शैव-वैष्णव हा प्रश्न मांडत असता आणि आता शैवाची पिछेहाट होत आहे याबद्दल लॅमेंट करत असता.

आता भारतात देखील मुस्लिम धर्म आपली लोकसंख्या वाढवत नेऊन येथे आपले वर्चस्व वाढवत नेत आहे हे देखील आपल्या लिखाणातून दिसते.(याचा विचार किंवा काळजी करणे म्हणजे धर्मांध हिन्दुत्ववादी असणे नाही हे प्रथम XXXकरांनी समजून घेणे गरजेचे आहे!)

या लॅमेंट मागे,

शैव संप्रदाय हे काम वैष्णव संप्रदायापेक्षा जास्त सामर्थ्याने करेल असे आपणास वाटते का?तसा काही ऐतिहासिक दाखला आहे का?का असे काही नसून शैव संप्रदाय जास्त न्याय्य नैसर्गिक आहे किंवा तुमचा तिकडे नैसर्गिक कल आहे?असे काही आहे.

योग्य वाटले तर ऊत्तर द्या.कदाचित आपल्या प्रदीर्घ लिखाणात हे असेल पण माझ्या वाचनात आले नाही.

धन्यवाद."


प्रथम आपले आभार! मुळात माझे मांडणी ही शैव विरुद्ध वैष्णव अशी नाही तर ती या देशातल्या आर्य लोकांच्या आधीच्या लोकांच्या असलेल्या श्रुती जी प्रथम शैव श्रुती होती नंतर जिला ब्राह्मण लोकांनी तंत्रश्रुती म्हणायला सुरुवात केली विरुद्ध या देशात आलेल्या युरेशियन लोकांची श्रुती म्हणजेच तंत्र अथवा शैव श्रुती विरुद्ध युरेशियन श्रुती जिला नंतर ब्राह्मण धर्माने वैदिक श्रुती म्हणायला सुरुवात केली अशा द्वंद्वातून केली गेलेली मांडणी आहे या मांडणीला एक जागतिक संदर्भ सुद्धा आहे वैष्णव धर्म हा युरेशियन श्रुती मधला वैदिक धर्म ब्राह्मण धर्म यांच्या नंतर जन्मलेला तिसरा धर्म आहे जो वर्ण आणि जातीव्यवस्था स्वीकारतो स्मृति ग्रंथांचे प्रामाण्य स्वीकारतो 


यातील वैदिक धर्माशी माझे फारसे भांडण नाहीये कारण वैदिक धर्म हा जेव्हा आला तेव्हा तो श्रद्धा या स्वरूपात होता आणि ही ऋग्वेदिक श्रद्धा जन्मदत्त वर्णव्यवस्था मानत नव्हती पुढे मग कालांतराने पुरुष सूक्त ब्राह्मण लोकांनी घुसवले आणि वर्ण जाती व्यवस्था ऑथेंटिक बनवली पण जगभरात मुळात हे मान्य आहे की हे सुक्त नंतर घुसवलेले आहे 


भारतामध्ये गेली हजार वर्षे वैष्णव धर्म प्रचंड डॉमिनेट करतो आहे आणि हे डॉमिनेशन इतके आहे की हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून हे लोक वैष्णव असलेली भगवतगीता मान्य करतात आणि तिला इतर सर्व हिंदूंनी म्हणजे सर्व शैव लोकांनी सुद्धा स्वीकारावी असा आग्रह करतात आता जर का गीता हा वैष्णव धर्मग्रंथ असेल तर हिंदूधर्म हा हिंदू धर्म कसा आणि ह्या हिंदू धर्माचे शैव लोक कसे काय भाग होऊ शकतात कारण तुम्ही तर धर्मग्रंथ म्हणून तुमचा वैष्णव धर्मग्रंथ लादत आहात तो शैव लोकांनी का स्वीकारावा ? या संदर्भात तुम्ही कसलेही स्पष्टीकरण देत नाही आणि कोर्टात जर ही गोष्ट प्रमाणित असेल तर मग सार्वजनिक जीवनात ती किती मोठ्या प्रमाणामध्ये आणली जात असेल आणि राबवली जात असेल ते स्पष्ट आहे एकीकडे शैव धर्म हा शैव पंथ आहे अशी मांडणी करायची आणि तो हिंदूंचा पंथ आहे अशी मांडणी करायची आणि प्रत्यक्ष मात्र धर्मग्रंथ म्हणून वैष्णवग्रंथ लादायचा यातला विरोधाभा स्पष्ट आहे मुळात या मांडणी मधूनच स्पष्ट व्हावे की हिंदू हा सुद्धा धर्म म्हणून युरेशियन एक्सटेन्शन आहे आणि म्हणून मग मांडणी शैव विरुद्ध वैष्णव अशी करावी लागते 


माझी स्वतःची हिंदू धर्माची व्याख्या ही सर्व भारतीय धर्म असे आहे ज्यामध्ये जैन आणि बौद्ध सुद्धा येतात किंबहुना हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असे मी मानतो आणि माझ्या मते अनेक हिंदुत्ववादी ही गोष्ट स्वीकारतात अलीकडे भागवत यांनी सुद्धा ही मांडणी केली होती पण ती त्यांना स्वतःलाच टिकवता आली नाही याचे कारण ब्राह्मण धर्माचे पुन्हा एकदा हिंदुत्ववादामध्ये वाढत चाललेले वर्चस्व आहे याचा एक परिणाम असा होतो की जागतिक पातळीवर इस्लाम हा सर्वात मोठा धोका आहे तो आपले वर्चस्व वाढवत नेऊन शेवटी संपूर्ण जगच इस्लाममय करेल असे तर्कदृष्ट्या दिसते कारण लोकसंख्या त्या पद्धतीने वाढत आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कुराण या धर्मसंहिते वरचा जबरदस्त विश्वासही! 


प्रश्न असा आहे की मग एकीकडे वर्ण आणि जात यांच्याशी लढायचे असेल तर वैष्णव धर्माशी लढावे लागते कारण तो धर्म वर्ण आणि जात या दोन्हींचे समर्थन करतो आणि तुम्ही जर का अलीकडची त्या धर्माच्या आचार्यांची अवतरणे ऐकलीत विधाने ऐकलीत की हे लोक पुन्हा एकदा वर्ण आणि जाती व्यवस्था आणायला निघालेले आहेत ते स्पष्ट होते आणि हे होणार नाही याची कसलीही खात्री नाही यातून मग होते असे की वैष्णव लोक हे इस्लामला मदत करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे इस्लाम विरोधातल्या सर्व लढाया ह्या प्रामुख्याने शैवधर्मी लोकांनी लढलेल्या लढाया आहेत म्हणजे औरंगजेबविरुद्ध जी लढाई आहे ती संभाजी महाराजांची आहे आणि ते शैव आहेत त्या उलट औरंगजेबाने युद्ध जिंकावे म्हणून ब्राह्मणांनी यज्ञ केलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे याचे कारण काय याची खोल मी मांसा केली तर आपणाला स्पष्टपणे दिसते की ब्राह्मण हा वर्ण हा स्पष्टपणे भगत आहे आणि भगत हे नेहमीच व्यावसायिक असतात त्यांना फक्त आपला फायदा दिसत असतो आणि नेमकी हीच गोष्ट ब्राह्मण लोकांच्या बाबत झालेली आहे ते नेहमीच फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि यामुळे अनेकदा त्यांचा सत्यानाश झालेला दिसतो प्रश्न असा आहे की सर्वच ब्राह्मण खरोखर ब्राह्मण आहेत का तर माझी यासंदर्भातली मांडणी अशी की जे आत्ताचे ब्राह्मण आहेत त्यापैकी जवळजवळ 70 ते 80 टक्के लोक हे मूळचे पंडित आहेत ते शैव आहेत आणि ते जाती वर्णव्यवस्था मानत नव्हते म्हणूनच मी नेहमी पुरोगामी ब्राम्हणांना सांगतो की तुम्ही आता स्वतःला पंडित म्हणवुन घ्या त्याशिवाय वर्ण जाती व्यवस्थेची येऊ घातलेली सिस्टीम अडवता येणे शक्य नाही जर का ब्राह्मण ह्या सिस्टिमला सामील झाले तर मग या देशांमध्ये पुन्हा एकदा अनर्थ माजणार आहे मी जर चुकलो नाही तर इस्लामला ही गोष्ट मदत करणारी ठरेल ओवीसी सारख्या लोकांच्या हे लक्षात आलेले आहे त्यामुळेच जसा भाजपचा वैष्णव चेहरा उदयाला यायला लागला तसे तसे ओवेसी भाजपचे गुणगान करायला लागले ही युतीची सुरुवात आहे ब्राह्मण वर्ण मग तो ब्राह्मणधर्मी असो किंवा वैष्णव धर्मी असो किंवा अलीकडच्या काळात हिंदू धर्मीय असो हा कळत नकळत स्वतःला उच्च ठेवण्यातच सार्थक मानतो यातून त्याची मुक्तता करण्याचा एकच मार्ग मला दिसतो तो म्हणजे ब्राह्मणांनी पंडित होणे आणि त्यांनी पंडित व्हायचे असेल तर त्यांना शैव धर्म स्वीकारणे खेरीज पर्याय नाही तो त्यांचा मूळचा धर्म असल्यामुळे त्यांना ते सहज शक्य आहे आणि एकदा का पंडित वाढले आणि ब्राह्मण कमी झाले तर मग इस्लामच्या खतऱ्यापासून आणि ब्राह्मण धर्माच्या वर्ण जाती व्यवस्थेपासून भारताला वाचवता येऊ शकते कारण शेवटी ज्ञानी लोक काय म्हणतात हे फार महत्त्वाचे असते दुर्दैवाने अलीकडे भाजप अशा ज्ञानी लोकांना प्रमोट करतो आहे जे वर्ण जाती व्यवस्थेचे समर्थक किंवा छुपे समर्थक आहेत किंवा मग जे भाजपचे मिंधे आहेत 


काँग्रेसशी माझे भांडण चालू आहे ते काँग्रेसच्या इस्लाम बाबतच्या धोरणावरून ! काँग्रेस इस्लाम बाबतचे आपले धोरण बदलेल असे आता दिसत नाही या लोकांनी समान नागरी कायदा करायला हवा होता तो त्यांनी केला नाही किंबहुना नेहरूंच्या नावाने जिथे बोंबा मारणे आवश्यक आहे त्यातल्या ज्या जागा आहेत त्यातली ही एक जागा आहे पण त्या बाबतीत भाजप लोक कधी बोलत नाहीत कारण मग हिंदुत्ववादी लोकांनी त्याचे स्वतंत्र हिंदू कोड बिल कसे मागितले हे पुढे येईल आणि त्यांना ते येऊ द्यायचे नाही संस्कृत या भाषेला या लोकांनी कसा विरोध केला ते पुढे येईल तेही त्यांना होऊ द्यायचे नाही संस्कृत वरचा आपला अधिकार सोडायचा नाही म्हणूनच अलीकडे हिंदी आणण्याचा डाव खेळला गेला 


समतेबाबत शैव धर्म हा अधिक समतावादी आहे म्हणून माझा त्याच्याकडे कल आहे आपल्याकडे अनेकदा बौद्ध धर्म हा समतावादी मानला जातो परंतु प्रत्यक्षात बौद्ध धर्मामध्ये गुलामगिरीचे समर्थन असते शैवधर्म हा असा एकमेव धर्म आहे की जो गुलामगिरी मानत नाही त्यामुळे साहजिकच माझा तिकडे कल आहे बसवेश्वर शिवाजी महाराज संभाजी महाराज पहिले बाजीराव होळकर व महात्मा फुले यांनी त्याची पुरोगामी पार्श्वभूमी ही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे म्हणून ऐतिहासिक पातळीवर सुद्धा तो जास्त वैष्णवांच्या पेक्षा प्रभावी आहे विशेषतः पुढे पुढे जाण्यात ! त्यामुळेच इस्लामविरुद्धची लढाई आज ना उद्या शैव लोकांनाच लढावी लागेल असे माझे स्पष्ट मत आहे बौद्ध लोक याबाबतीत मुस्लिमांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिन्हे दिसत आहेत त्यामुळे तुम्ही म्हणता तसा तो नैसर्गिक कल नसून सांस्कृतिक कल आहे असे म्हणता येईल शिवाय जे मुस्लिम लोक समान नागरी कायदा स्वीकारायला तयार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि महात्मा फुले यांनी व्यवस्थित पुरोगामी जागा शैव-धर्मामध्ये तयार केलेली आहे त्यामुळे मुस्लिम लोकांच्या सामावून जाण्याच्या शक्यता घेण्याच्या शक्यता शैव धर्मात जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि मुख्य म्हणजे त्या आधुनिकतेच्या दिशेने नेण्यात जास्त शक्तिशाली आहेत आला तर तुमच्या बरोबर नाही आलात तर तुमच्या विना आणि आमच्याविरुद्ध लढला तर हर हर महादेव सरळ युद्ध अशा तिन्ही शक्यता फक्त शैव-धर्मामध्येच दिसतात 


आता प्रश्न असा की अंतिमतः हिंदुत्ववादी लोक कुठे जाणार ? तर आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर हे इस्लाम बरोबर युती करणार आणि बाराव्या शतकापासून ब्राह्मण आणि मुस्लिम यांची युती आली आणि जिने भक्तीचा गौरव केला वाढवला आणि अंधश्रद्धा वाढवल्या ज्ञानाच्या विरोधात चळवळी उभा केल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाकारले तशीच युती पुन्हा 21व्या शतकात होणे अटळ आहे या युतीत ब्राह्मण धर्माचे नुकसान झाले आणि इस्लामचे नुकसान झाले पुन्हा ही युती झाली तर या दोघांचे नुकसान होऊन शेवटी शैव लोकांना त्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल


इतिहासाची साक्ष काढली तरी पुन्हा पुन्हा दिसते की शैव जेव्हा एकत्र येतात मग ते शिख म्हणून एकत्र येवोत किंवा मराठा म्हणून एकत्र येऊन किंवा जाट म्हणून एकत्र येऊन ते लढतात परंतु ते वैष्णव झाल्यानंतर मात्र चक्क दिल्लीची चाकरी करायला लागतात वैष्णव झाल्यानंतर आणि जय कृष्ण म्हणायला लागल्यानंतर सगळे राजपूत कसे मुगल राजवटीची सेवा करायला लागले ते स्पष्ट दिसते 


सर्वात वाईट गोष्ट जर काय असेल तर ती म्हणजे शैवधर्माला वर्ण जाती व्यवस्थेचा स्वीकार करायला लावणे अजूनही शैवधर्मी लोक हा अजेंडा स्वीकारायला तयार नाहीत पण एकदा का त्यांनी तो स्वीकारला तर मात्र भारतामध्ये इस्लामिक राजवटी सारखी राजवट आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच मग शंकराला अत्यंत जाणीवपूर्वक रुद्र म्हणणे शंकराचे रुद्रीकरण करणे आणि अनेकदा त्यानेच वेद निर्माण केले किंवा वेदांना मान्यता दिली असे दाखवणे त्याच्या नावाने वर्ण जातीच्या अंगाने काही कथा लिहिणे जेणेकरून जणू काय शंकरांना वर्ण जाती व्यवस्था मान्यच होती असे चित्रण व्हावे अशा अनेक गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे सध्या केल्या जात आहेत यामध्ये हिंदुत्ववादाचे किती नुकसान होणार आहे याची कल्पना सुद्धा अनेकांना नाही हिंदुत्ववादाने सावध होणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हिंदुत्ववादाच्या नावाने ब्राह्मणवाद येणे अटळ हा देश राष्ट्रीय आणि राज्यीय आत्महत्या करू शकतो त्याने ती इतिहासात अनेकदा केलेली आहे म्हणूनच सावधान करण्यासाठी म्हणून ही मांडणी सतत चाललेली आहे मी हिंदू हा शब्द भारतात जन्मलेले सर्व धर्म या अर्थानेच वापरत असतो आणि त्या लोकांचे भले करणे हे हिंदुत्ववादाचे आद्य कर्तव्य आहे असे मानतो आणि जर का हिंदुत्ववादी हे लोक करणार नसतील आणि ते फक्त ब्राह्मणवादाच्या नावाखाली वर्ण जाती व्यवस्था आणि वर्ण वर्चस्व सांस्कृतिक ताटात वाढणार असतील तर ते ताट स्वीकारण्याची माझी तयारी नाही


आता राहिला प्रश्न तो अर्थव्यवस्थेचा ! मला स्वतःला उजवे धोरण काय करते ते पहायचे होते मी स्वतः बसवेश्वरांच्या कल्याणवादी धोरणाला मानतो मी स्वतः याला मध्यकल्याणवाद म्हणतो या उजव्या धोरणाने मध्यकल्याणवादाला किती मदत केली याचे मूल्यमापन आता करणे आवश्यक झालेले आहे जर का हिंदुत्ववादाच्या नावाखाली लोकांचे कल्याण होणार नसेल तर मग हिंदुत्ववाद आला काय आणि न आला काय ? हिंदुत्ववाद हा फक्त अडाणी आणि अंबानी यांचे भले करण्यासाठी जन्मलेला नाही तो सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी झटला पाहिजे जर तो तसा झटत नसेल तर मग त्याला आर्थिक पातळीवर सुद्धा मी विरोध करेन या संदर्भात मोदींची या टर्मची राजवट संपली की मग मी सावकाश लिहिन कारण उजव्या धोरणाला सुद्धा पंधरा वर्षे दिली गेली पाहिजे असे माझे मत होते आता म्हणाल तर मी फार अतिरेकी उजव्या धोरणाच्या बाजूने नाही सरकारचे काम लोकांचे कल्याण करणे असे असते ते जर का होत नसेल तर मात्र मोदींनी आपल्या सर्व धोरणांचा आर्थिक धोरणांचा फेरविचार करायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे मी हिंदुत्ववादी मंचावर जात नाही याचे सर्वात मोठे कारण हिंदुत्ववादावर टीका करण्याचा सुद्धा माझा अधिकार मी त्यामुळे अबाधित ठेवतो मोक्षकाने आणि सिद्धाने आपले स्वातंत्र्य जपलेच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे 


श्रीधर तिळवे नाईक

No comments:

Post a Comment