गाणपत्य संप्रदाय आणि गणपती श्रीधर तिळवे नाईक
गणपत्य संप्रदाय हा मूळचा पंचसिद्धातून निर्माण झालेला संप्रदाय आहे. शैव श्रुतीमध्ये शंकर , पार्वती , नंदी , स्कंद यांच्या बरोबरीने ज्ञानतंत्राचा पहिला शिष्य ज्याने ज्ञानतंत्राच्या साह्याने मोक्ष मिळवला असा शंकरांचा शिष्य सिद्ध म्हणून गणपतीला ओळखले जाते तो रंगाने मूळचा काळा होता परंतु नंतर ब्राह्मण परंपरेत तो गोरा होत गेला अर्थातच त्याचे तोंड अजिबात हत्तीचे नव्हते तर माणसाचेच होते कारण तो माणूस होता मात्र हत्ती वर नियंत्रण ठेवण्यात आणि अंकुश ठेवण्यात तो अतिशय प्रवीण होता म्हणूनच पुढे ज्ञान तंत्रामध्ये अंकुश ठेवणे या गोष्टीला कमालीचे महत्त्व प्राप्त झालेले दिसते अगदी गणपतीच्या नंतरच्या मूर्तींच्या मध्ये सुद्धा अनेकदा हा अंकुश येतो
वैदिक लोकांनी ऋग्वेदामध्ये गणपती हा शब्द वापरला आहे परंतु प्रत्यक्षात त्या गणपतीचा अर्थ काय होतो हा एक अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे अलीकडच्या काळात तो गणपतीचा उल्लेख मानला जात असला तरी प्राचीन काळामध्ये तो तसा होता की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे मुळातच गण ही शैव संकल्पना हळूहळू वैदिक लोकांच्यात प्रवेश करताना दिसते सुरुवातीच्या काळात ती नसावी असेच वाटते सर्वसाधारणपणे दिसते ते असे की ऋग्वेदामध्ये गण आहे पण गणपती नाही आणि असला तर तो यज्ञविनाशक आहे त्यामुळेच त्याला विघ्न कर्ता म्हटले आहे
नंतर मात्र मरुतगणाचा अधिपती रुद्र आहे म्हणजे शंकर आहे याच गणामध्ये असलेला हनुमान त्यामुळेच शंकराचा अवतार झाला अशी संकल्पना उदयाला आली
यजुर्वेदामध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या सर्वच गण हे
रुद्राचीच पूजा करतात म्हणजेच सर्व गणांचा देव हा रुद्र आहे आता हे आश्चर्यकारक आहे परंतु मुळातच अनेक अवैदिक गण या काळामध्ये माहित झाले होते आणि ते शंकराची पूजा करतात हेही सर्वांना माहीत झाले होते साहजिकच या काळामध्ये विशेषत : यजुर्वेदामध्ये गणपती स्वीकारला गेला आणि म्हणूनच तुम्हाला असे दिसेल की श्रमण धर्मांच्या मध्ये गणपतीची पूजा आज सुद्धा रूढ आहे अगदी जैन धर्मामध्ये तर ती खूपच आहे कारण वृषभनाथ ज्या आदिनाथांच्या पासून ज्ञानतंत्र शिकले त्यांच्यापासूनच गणपती हा सुद्धा ज्ञानतंत्र शिकला असे मानले जाते त्यामुळे एका अर्थाने तो शिष्य बंधू आहे त्यामुळेच जैन लोक आनंदाने गणपतीची पूजा करतात अनेक जैन घरांच्या मध्ये गणपती बसतो सुद्धा आणि ते स्वाभाविक आहे कारण तो त्यांच्या भूतकाळाचा एक अटळ भाग आहे परंतु बौद्ध धर्मामध्ये अगदी जापान सारख्या प्रदेशात सुद्धा गणपती दिसतो कारण शेवटी श्रमण परंपरेमध्ये गणपतीला ज्ञानतंत्राचा सिद्ध म्हणून खूप मान आहे
पुढे पुढे तर रुद्र हा भूत आणि पिशाच यांना मारतो अशी संकल्पना आली याचा अर्थ स्पष्ट आहे रुद्र ही देवता अनार्य लोकांच्या विनाशासाठी जन्माला घातली गेली बहुदा या काळामध्ये अनार्य - आर्य संघर्ष वाढलेला असावा
थोडे पुढे गुह्यसूत्रात गणपती हा स्पष्टपणे विघ्न निर्माण करणारा देव आहे त्याच्यामुळे बायकांना नवरे मिळत नाहीत राजाला राज्य मिळत नाहीत आणि विद्वानांना आदर मिळत नाही असा उल्लेख आहे
बोधायन सूत्रात गणपतीला जी प्रार्थना केली जाते ती त्याने आमच्या यज्ञापासून तू दूर राहा आम्हाला त्रास देऊ नकोस अशा स्वरूपाची आहे गणपती अवैदिक देवता आहे हे इथे स्पष्ट आहे
वराह पुराणांमध्ये यमाच्या विनंतीवरून शंकराने गणपतीला निर्माण केले अशी पहिली निर्माण कथा येते इथेच गणपतीच्या निर्माण कथेचे ब्राह्मणीकरण सुरू होते
अग्निपुराणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांनी अत्यंत जाणीवपूर्वक अडथळे यावेत म्हणून गणपतीला अडथळे निर्माण करण्यासाठी जन्माला घातले अशी निर्माणकथा सांगितली आहे
मत्स्यपुराणामध्ये गणपतीची तिसरी निर्माण कथा येते आणि हीच कथा आता प्रचलित झाली आहे ती म्हणजे गणपती हा पार्वती पुत्र आहे मात्र इथे ब्रह्माने त्याला विनायक केलेले आहे
शैव पुराणे जेव्हा पंडित लोकांच्याकडून निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या पुढचे प्रश्न वेगळे होते कारण एकीकडे त्यांना शैव श्रुती शाबूत ठेवायची होती तर दुसरीकडे वैदिक श्रुतीचा मानही ठेवायचा होता साहजिकच लिंग पुराणामध्ये गणपतीचा प्रथम उल्लेख येतो तो विघ्नहर्ता म्हणजेच संकटाचे नाश करणारा म्हणून येतो इथून पुढे गणपती हा विघ्न आणणारा नसून विघ्न नाहीसा करणारा असा देव आहे अशी कथा आहे
लिंग पुराण हे मुळातच शिव ही मुख्य देवता केंद्र स्थानावरून हटवून त्या जागी त्याचा पुत्र मुख्य देवता म्हणून पुढे आणणे हा हेतू ठेवून निर्माण झाले आहे साहजिकच आता शंकराची सर्व लक्षणे ही गणपतीला दिली गेलेली आहेत
गणपतीची पूजा आत्ताच्या स्वरूपात केलीच जात नव्हती त्यामुळे साहजिकच गणपतीचे शिल्प किंवा मूर्ती शैव परंपरेमध्ये फारशी आढळत नाही आणि आढळली तरी ती नेहमीच काळया रंगात होती या मूर्तींच्यापैकी आता फक्त एकाच ठिकाणी मूर्ती शिल्लक राहिलेली आहे कदाचित उत्खननामध्ये आणखीन काही मुर्त्या सापडू शकतात त्यांना जे तोंड आहे ते माणसाचे आहे हत्तीचे नाही कारण शैव श्रुतीमध्ये गणपती हा शंकराचा पुत्र आहे तो कृष्णवर्ण आहे आणि शंकरांच्याकडून मोक्षाच्या ज्ञानतंत्राचा उपदेश घेणारा त्यांचा आद्य शिष्य आहे ज्ञानतंत्रातला प्रत्येक मनुष्य त्याला म्हणूनच नमस्कार करतो अगदी ज्ञानेश्वरसुद्धा ओम नमोजी आद्या म्हणूनच सुरुवात करतात याचे कारण उघड आहे तो शैव असल्याने साहजिकच तो पंडितांचा पहिला आद्यबिंदू आहे त्यामुळेच आद्यबिंदू म्हणून सर्व पंडित हे गणपतीची पूजा करत होते त्यांच्यासाठी तोच आरंभ आहे कारण ज्ञान तंत्राचा आरंभ हा त्याला दिलेल्या उपदेशापासून होतो हे पंडित जेव्हा ब्राह्मण झाले तेव्हा मग गणपतीच्या स्वरूपामध्ये फरक पडत गेला आणि तो रंगाने गोरा झाला आणि मुख्य म्हणजे पार्वतीचा मुलगा तिने स्वतः तयार केला ही संकल्पना उदयाला आली . आपण आपल्याच देवताचे विरुपीकरण करतो हे या लोकांना कळले नाही माझे म्हणणे नेहमीच हे असते की तुम्हाला ब्राह्मण राहायचे असेल तर तुम्ही ब्राह्मण रहा पण तुम्ही शैव धर्माचा संपूर्ण त्याग करा आम्ही दोन्हींच्याकडून फायदे उपटतो ही जी काय तुमची वृत्ती आहे ती चालणार नाही
याच लोकांनी लिंग पुराण वगैरे शैव पुराणे रचली. कारण हे लोक मूळचे पंडित असल्यामुळे अनेक मूळच्या शैव कथा या लोकांच्याकडे वारसा हक्काने होत्या त्यांनी स्वतःचे ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी पुराणे निर्माण करताना युरेशियन परंपरेला जे बदल हवे होते ते बदल करून दिले
ज्याला आज गणपती म्हटले जाते त्याचे पहिले शिल्प त्यामुळेच प्रथम मथुरेत सापडते ते साधारण चौथ्या शतकातले आहे त्यानंतर उदय गिरीच्या गुंफात ते सापडते भुमरा येथील शिव मंदिरात प्रथम आपणाला गणपतीची सोंडमूर्ती दिसते
भवभूती हा शैव संन्यासी होता त्यामुळे त्याच्या मालतीमाधव मध्ये गणपतीच्या पूजेचा प्रथम उल्लेख येतो (माधव हे नाव प्रथम शंकराचे होते नंतर ते कृष्णालाही दिले गेले हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना महादेव या शब्दाचे माधव हे अपभ्रंश झालेले रूप आहे )
गाणपत्य संप्रदायामध्ये भक्तीच्या द्वारे मोक्षाला पोहोचलेला पहिला मराठी संत म्हणून मोरया गोसावी या संताचा उल्लेख करावा लागतो ते चिंचवड पुणे मधले असल्याने साहजिकच पुण्यामध्ये गणपतीचा सर्वाधिक जयजयकार चालतो आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो त्याचे खरे कारण हे आहे की गणपती बाप्पाला पुजत जो शून्यापर्यंत पोहोचला त्या संताचे नाव मोरया होते म्हणून आपण त्या दोघांचे नाव एकत्र घेतो यानेच मराठीतील अष्टविनायक संप्रदायाची स्थापना केली आणि हे अष्टविनायक केंद्रस्थानी आणले हा बाराव्या शतकामध्ये होता एवढेच आता आपल्याला माहिती आहे अर्थातच त्याचे ब्राह्मणीकरण होऊन हल्ली सर्वच गोष्टी बदललेल्या दिसतात
अष्टविनायक ही एक विशिष्ट पद्धतीची तांत्रिक रचना आहे सात चक्रांशी तिचा संबंध आहे आणि आठवा अर्थातच तिसरा डोळा जो उघडतो तो आहे अष्टविनायकाची पूजा करणारे लोक आता या भक्ति साधने पासून इतके तुटलेले आहेत की त्यांना आपण अष्टविनायकाची भक्ती कशी करावी हे सुद्धा माहित नाही दंतकथांच्या प्रदेशांमध्ये मूळचा उद्देश हरवलेला आहे महाराष्ट्रातले सुरुवातीचे पेशवे हे या संप्रदायातले होते आणि त्यामुळेच गणपती हे त्यांचे कुलदैवत होते गाणपत्य संप्रदायामध्ये वर्ण आणि जात मानली जात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच बाजीराव पेशव्याचा एक सेनापती ज्यांना आज पूर्वाश्रमीचे महार म्हटले जाते त्यांच्यातून आलेला होता आणि बाजीराव त्याच्याबरोबर बसून जेवण घेत होता किंबहुना वर्ण आणि जात व्यवस्थेला या संप्रदायाने प्रचंड विरोध केलेला आहे त्यामुळेच गणपतीचे कुठलेही मंदिर हे वर्ण आणि जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली बंद ठेवता येत नाही त्याचे दर्शन सर्वांना खुलेच असले पाहिजे किंबहुना मोरया गोसावी या संताचे जे कार्य होते ते यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे होते सर्व अष्टविनायकांची मंदिरे सर्वांनाच खुली असली पाहिजे आणि श्रीमंताला सुद्धा रांगेनेच दर्शन घ्यावे लागेल हा त्यांचा उपदेश होता तो सध्या बाजूला केला जात आहे म्हणून हे सांगावे लागत आहे
गणपती बाप्पा मोरया ही केवळ घोषणा नाही तो साधनेचा मंत्र आहे हे आता लक्षातच राहिलेले नाही त्याचा मूळ अर्थ तूच माझा बाप आहेस आणि तुझ्या खेरीज कोणी नाही तुझ्यात मला विलीन करून घे असा आहे हा संप्रदाय अर्थातच गोसावी संप्रदायाचा एक भाग आहे महाराष्ट्रामध्ये मुळातच गाणपत्य झालेल्या पंडितांना गोसावी म्हटले जात होते बाळ सिताराम मर्ढेकर यांचे घराणे हे मूळचे गोसावी घराणे होते आणि त्यामुळेच मर्ढेकर आधुनिक कविता लिहू शकले कारण घरात प्रगती वाद अस्तित्वात होता आपल्याला अनेकदा ही कनेक्शन्स कळत नाहीत किंबहुना ती आपणाला कळून घ्यायची नसतात पण ती अनेकदा असतात असो हा संप्रदाय अवैदिक असल्याने त्याचा फारसा उल्लेख आपणाला दिसत नाही
नाथ संप्रदायामधून हेरंब संप्रदाय जो आला तो हेरंबनाथ या नाथसंप्रदायी सिद्ध व्यक्तीने स्थापन केला होता तो नेपाळचा की महाराष्ट्राचा हा एक फार मोठा वाद आहे एकेकाळी महाराष्ट्रात याचा सुद्धा प्रभाव होता या हेरंबनाथाची साधना सुद्धा जैन साधनेने प्रभावित होती आणि त्यामुळे साहजिकच दिगंबर संप्रदायाचा त्याच्यावर प्रभाव होता त्याच्या या प्रभावाचा ठसा या संप्रदायावर सुद्धा उमटलेला दिसतो (जैन धर्म लोकांनी त्याला क्लेम कसे केले नाही हाच प्रश्न पडतो)
हेरंब तंत्र असे मानते की पाच प्रकारच्या मुद्रा अवगत केल्या की आपणाला मोक्ष मिळतो यातील सहावी मुद्रा ही साहजिकच त्यामुळे मोदमुद्रा आहे
१ दंतमुद्रा : दात हे वाणीचे पहारेकरी असतात त्यामुळे सर्वात प्रथम जो वाणीवर नियंत्रण ठेवतो तो मग अनेक गोष्टींच्यावर नियंत्रण ठेवू शकतो म्हणून या संप्रदायांमध्ये साधनेची सुरुवात दंत साधने पासून होते यात सर्वात प्रथम वाणीवरचे नियंत्रण प्राप्त करणे हाच आरंभ असतो
२ पाश मुद्रा : ही आपण पाशामध्ये बांधले गेलो आहोत आहोत याचे झालेले ज्ञान दर्शवते आता मी सर्व पाशांना हाताच्या मुठीत ठेवू शकतो असा त्याचा अर्थ आहे इथून पुढे कामवासनेवर , अन्न वासनेवर, जलवासनेवर आणि वायुवासनेवर नियंत्रण मिळवले जाते
३अक्ष मुद्रा : ही सर्वसाधारणपणे अक्षमाला या स्वरूपात दाखवली जाते आणि तिचा अर्थ मला अर्थ काम मोक्ष हे तिन्ही अक्ष कळलेले आहेत आणि आता मी मोक्ष या महा अक्षाच्या दिशेने साधनाप्रवास करत आहे त्याची ती निदर्शक आहे इथे धारणा आणि ध्यान यांना महत्त्व दिले जाते
४ अंकुश मुद्रा:ही सर्व वासनांच्यावर इंद्रियांच्यावर आणि स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणारी मुद्रा म्हणून येते
५ अभय मुद्रा : म्हणजे भयापासून आणि अहंकारापासून मुक्ती होय कारण सर्वात शेवटी मरणाचे भय येते अभय मुद्रा तुम्हाला या सर्व भयांच्या पासून मुक्त करते
६ मोद मुद्रा : ही शेवटची मुद्रा आहे कारण मदाचा म्हणजे अहम- अंत झाल्यावर तुम्ही मोद होता म्हणजेच मोक्ष मिळाल्यानंतर तुम्ही मोद म्हणजेच आनंदाला उपलब्ध होता हा आनंद चिर स्थायी असतो (मोदक हा याच संप्रदायाने जन्माला घातला असे म्हटले जाते तो मुळात मोद म्हणजे आनंदाचा मुद्राकार आहे आणि म्हणूनच तो बनवताना विशिष्ट पद्धतीने बनवला जातो त्याचा आकार कंपल्सरी चक्राकार ठेवावा लागतो तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी मोद बनवू शकत नाही आणि तो गोड असावा लागतो ) मोक्ष मिळाल्यानंतर माणसाचे आयुष्य गोड होऊन जाते
दुर्दैवाची गोष्ट अशी की हा मूळचा अर्थ नष्ट झाला आणि त्या जागी काही भलत्याच गोष्टी आल्या मुख्य म्हणजे दहा हात आले आणि हळूहळू मुख्य दिशा नाहीशी झाली
पाच दिवसाचा गणपती हा या हेरंब संप्रदायाने आणला या पाच दिवसांमध्ये या पाच साधना मुद्रांची साधना करायची असते आणि पाचव्या दिवशी जेव्हा तुमच्या अहंकाराचे विसर्जन होते तेव्हा तुम्हाला सहाव्या मुद्रेचा लाभ होतो म्हणजे मोक्ष मिळतो आणि मोक्ष मुद्रा प्राप्त होते असो हेरंबोपनिषद , विनायक तंत्र वगैरे ग्रंथांमध्ये नंतर यांची माहिती आलेली दिसते पण ती मूळ साधनेपासून तुटलेलीच आहे
साधारणपणे दहाव्या शतकानंतर गणपती हाच ब्रह्म आहे ही संकल्पना अधिकाधिक दृढ होत अनेकांनी गणपतीला आदिदेवतेचा मान द्यायला सुरुवात केली
मूळचा गणपती उत्सव का आला वगैरे वगैरे वर मी एक स्वतंत्र लेख मागच्या कुठल्यातरी गणेशोत्सवाला टाकला होता त्यामुळे त्यात जात नाही आता थोड्या वेगळ्या अंगाने आणखी काही माहिती द्यावी म्हणून हा लेखन प्रपंच केला
या गणपती उत्सवात निदान काही अंशी तरी तुम्ही गणपतीच्या खऱ्या साधनेकडे वळावे अशी अपेक्षा करून हा लेख संपवतो
जय गणेश हर हर महादेव
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment